मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड गाठला आहे. 103 किलोमीटरच्या व्हायाडक्टच्या दोन्ही बाजूंना 206,000 नॉईज बॅरियर्स (आवाज प्रतिबंधक) बसविण्यात आले आहेत. प्रत्येकी 1 किलोमीटर अंतरासाठी, व्हायाडक्टच्या प्रत्येक बाजूस 2,000 नॉईज बॅरियर्स धोरणात्मकदृष्ट्या बसविण्यात आले आहेत.
बुलेट ट्रेन व नागरी रचनेमुळे निर्माण होणारा आवाज कमी करण्यासाठी नॉईज बॅरियर्स तयार करण्यात आले आहेत. हे नॉईज बॅरियर्स ट्रेनच्या एअरोडायनॅमिक आवाजाला परावर्तित आणि वितरित करतात, तसेच रेल्वे ट्रॅकरुळांवरून धावणाऱ्या चाकांमुळे निर्माण होणारा आवाजही कमी करतात. प्रत्येक नॉईज बॅरियर 2 मीटर उंचीचा, 1 मीटर रुंदीचा असून त्याचे वजन सुमारे 830-840 किलो आहे. निवासी व शहरी भागांमध्ये, 3 मीटर उंचीचे नॉईज बॅरियर्स बसवण्यात आले आहेत. या नॉईज बॅरियर्समध्ये 2 मीटर नॉईज बॅरियरवर 1 मीटर उंचीचा पारदर्शक पॉलीकार्बोनेट पॅनेल बसवण्यात आला आहे, ज्यामुळे प्रवाशांना विहंगम दृश्यांचा आनंद घेता येतो.
या नॉईज बॅरियर्सच्या निर्मितीसाठी सहा समर्पित कारखाने स्थापन करण्यात आले आहेत. त्यापैकी तीन अहमदाबादमध्ये, तर प्रत्येकी एक सूरत, वडोदरा आणि आणंद येथे आहेत.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या महत्त्वाच्या बांधकामांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. 243 किमीहून अधिक व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले आहे. तसेच, 352 कि.मी. पियरचे बांधकाम आणि 362 कि.मी. पियर फाउंडेशनचे काम देखील पूर्ण झाले आहे. 13 नद्यांवर पूल बांधण्यात आले आहेत, तर पाच स्टील पूल व दोन पीएससी पूल वापरून अनेक रेल्वे लाईन्स व महामार्गांच्या वरून बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
गुजरातमध्ये ट्रॅक बांधकाम वेगाने सुरू असून, आणंद, वडोदरा, सूरत आणि नवसारी जिल्ह्यांमध्ये आरसी (रिइनफोर्स्ड काँक्रीट) ट्रॅक बेडचे काम सुरू आहे. आतापर्यंत 71 ट्रॅक किमी आरसी ट्रॅक बेडचे काम पूर्ण झाले असून व्हायाडक्टवर ट्रॅकच्या वेल्डिंगला सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्रात, मुंबई बुलेट ट्रेन स्टेशनसाठी 32 मीटर खोलीवर (10 मजल्यांच्या इमारतीच्या समतुल्य) पहिले काँक्रीट बेस-स्लॅब यशस्वीरित्या टाकण्यात आले आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ते शिळफाटा या 21 किमी बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे. मुख्य बोगद्याच्या बांधकामासाठी 394 मीटरची इंटरमिजिएट टनेल (एडीआयटी) निर्मिती पूर्ण करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यात सात डोंगरी बोगद्यांचे बांधकाम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (एनएटीएम) पद्धतीने सुरू आहे. गुजरातमधील एकमेव डोंगरी बोगदा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे.
परिसरातील 12 स्थानके, जी विशिष्ट घटक व उर्जाक्षम वैशिष्ट्यांसह तयार करण्यात आली आहेत, ती जलद गतीने बांधली जात आहेत. पर्यावरणपूरकता जपून जागतिक दर्जाचा प्रवासी अनुभव देण्यासाठी या ऊर्जा-सकारात्मक स्थानकांची रचना करण्यात आली आहेत.
“मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने हाय-स्पीड रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एक नवी उंची गाठली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व पर्यावरणीय बाबींचा समतोल साधत, हा प्रकल्प केवळ कनेक्टिव्हिटी बदलत नाही तर मोठ्या प्रमाणावर सामाजिक आणि आर्थिक फायदे देखील निर्माण करीत आहे. हजारो रोजगारांची निर्मिती, स्थानिक उद्योगांचा विकास आणि प्रादेशिक पायाभूत सुविधा सुधारणे यासह हा प्रकल्प प्रादेशिक विकासाला चालना देत, प्रवासाचा वेळ कमी करणे, गतिशीलता वाढवणे आणि जीवनशैली सुधारण्यासाठी हातभार लावत आहे,” - श्री. विवेक कुमार गुप्ता, व्यवस्थापकीय संचालक, एनएचएसआरसीएल.