मुंबई बुलेट ट्रेन स्टेशनचा पहिला काँक्रीट बेस स्लॅब 30 नोव्हेंबर 2024 रोजी जमिनीपासून अंदाजे 32 मीटर खोलीवर टाकण्यात आला, जो 10 मजली इमारतीच्या समतुल्य आहे.
स्टेशनचे बांधकाम तळापासून वरच्या पद्धतीने केले जात आहे, म्हणजेच जमिनीपासून खोदाईचे काम सुरू झाले असून पायापासून काँक्रिटीकरणाचे कामही सुरू झाले आहे.
हा स्लॅब 3.5 मीटर खोल, 30 मीटर लांब आणि 20 मीटर रुंद आहे. स्टेशनसाठी टाकल्या जाणाऱ्या 69 स्लॅबपैकी हा पहिला आहे, जो बुलेट ट्रेन स्टेशनसाठी सर्वात खोल बांधकाम पातळी बनवेल.
या स्लॅबबद्दल काही रंजक माहिती खाली दिली आहे:
- 681 मेट्रिक टन उच्च दर्जाचे स्टीलचे मजबुतीकरण
- 6200 रिबार कपलरचा वापर
- 2254 घन मीटर एम60 दर्जाचा काँक्रीट
- 4283 मेट्रिक टन ऍग्रीगेट्सचा वापर
प्रत्येकी 120 m3 क्षमतेच्या दोन इन-सिटू बॅचिंग प्लांटद्वारे काँक्रीटचा पुरवठा केला जात आहे. काँक्रीट ओतण्याच्या वेळी तापमान 25 अंश सेल्सिअसच्या खाली ठेवण्यासाठी इन-सिटू बर्फ आणि चिलर प्लांटद्वारे तापमान नियंत्रित केले जात आहे.
स्लॅब टाकण्यापूर्वी पुरेशा जलरोधक उपायांची खात्री केली आहे.
मुंबई बुलेट ट्रेन स्टेशनबद्दल:
मुंबई बुलेट ट्रेन स्टेशन बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे स्थित असून, मुंबई-अहमदाबाद एचएसआर रेल्वे मार्गावरील एकमेव भुयारी स्टेशन आहे.
हे प्लॅटफॉर्म जमिनीपासून सुमारे 24 मीटर खोलीवर नियोजित करण्यात आले आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये प्लॅटफॉर्म मजला, संकुल मजला आणि सेवा मजला असे तीन मजले असतील. संबंधित कामासाठी सध्या जमिनीपासून 32 मीटर खोलीपर्यंत उत्खनन केले जात आहे.
स्टेशनमध्ये 6 प्लॅटफॉर्म असतील, आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मची लांबी सुमारे 415 मीटर असेल (16 कोचांच्या बुलेट ट्रेनसाठी पुरेशी). स्टेशनला मेट्रो आणि रस्त्याद्वारे जोडणी दिली जाईल.
दोन प्रवेश/निर्गमन बिंदू नियोजित करण्यात आले आहेत. यामधील एक नजीकच्या मेट्रो लाईन 2बीच्या मेट्रो स्थानकाकडे जाण्यासाठी आणि दुसरा एमटीएनएल इमारतीकडे जाण्यासाठी आहे.
स्थानक अशा प्रकारे नियोजित करण्यात आले आहे की प्रवाशांच्या हालचालीसाठी आणि सुविधा उपलब्ध करण्यासाठी पर्याप्त जागा प्रदान करण्यात आली आहे, ज्यामध्ये कॉन्कोर्स आणि प्लॅटफॉर्म स्तराचा समावेश आहे.
नैसर्गिक प्रकाशासाठी समर्पित स्कायलाइटची व्यवस्था करण्यात आली आहे.