नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) ने आज मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉरसाठी महाराष्ट्र राज्यात भारतातील पहिला 7 किमी लांबीचा समुद्राखालील रेल्वे बोगदा यासह 21 किमी लांबीच्या बोगद्याच्या बांधकामासाठी ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडसोबत करार केला आहे. हा करार एमएएचएसआर सी-2 पॅकेज अंतर्गत येतो. या निविदेच्या तांत्रिक निविदा 9 फेब्रुवारी 2023 रोजी उघडण्यात आल्या आणि वित्तीय निविदा 6 एप्रिल 2023 रोजी उघडण्यात आल्या.
श्री राजेंद्र प्रसाद, व्यवस्थापकीय संचालक, एनएचएसआरसीएल यांचे म्हणणे:
“21 किमी लांबीच्या बोगद्याचे बांधकाम मुंबई-अहमदाबाद एचएसआर कॉरिडॉरच्या सर्वात आव्हानात्मक करारांपैकी एक आहे, ज्यात ठाणे खाडी येथे देशातील पहिल्या 7 किमी लांबीच्या दुहेरी मार्गाच्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याच्या बांधकामाचा समावेश आहे. या बोगद्याच्या बांधकामासाठी तीन टनेल बोरिंग मशीन आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथडचा वापर केला जाईल.”
महत्त्वाची वैशिष्ट्ये:
21 किमी लांबीचा हा बोगदा महाराष्ट्र राज्यात वांद्रे-कुर्ला संकुल येथील भूमिगत स्टेशन आणि शिळफाटा दरम्यान असेल.
ठाणे खाडी (इंटरटायडल झोन) येथे अंदाजे 7 किमी लांबीचा समुद्राखालील बोगदा देशातील पहिला समुद्राखालील रेल्वे बोगदा असेल.
हा बोगदा अप आणि डाउन दोन्ही मार्गांसाठी दुहेरी मार्गासाठी सिंगल ट्यूब बोगदा असेल. पॅकेजच्या भाग म्हणून बोगद्याच्या जागेला लागून 37 ठिकाणी 39 उपकरण कक्ष देखील बांधले जातील.
हा बोगदा बांधण्यासाठी, 13.1 मीटर व्यासाच्या कटर हेड असलेल्या टीबीएमचा वापर केला जाईल. सामान्यतः एमआरटीएस - मेट्रो प्रणालीमध्ये वापरल्या जाणार्या शहरी बोगद्यांसाठी 5-6 मीटर व्यासाचे कटर हेड वापरले जातात.
बोगद्याचा अंदाजे 16 किमी भाग बनवण्यासाठी तीन टनेल बोरिंग मशीनचा वापर केला जाईल आणि उर्वरित 5 किमी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM) द्वारे बनविला जाईल.
हा बोगदा जमिनीच्या पातळीपासून सुमारे 25 ते 65 मीटर खोल असेल.
बीकेसी (पॅकेज सी1 अंतर्गत), विखरोळी आणि सावळी येथे अनुक्रमे अंदाजे 36, 56 आणि 39 मीटर खोलीवरील तीन शाफ्ट बांधकामाला मदत करतील. घणसोली येथे 42 मीटरचा तिरकस शाफ्ट आणि शिळफाटा येथे बोगदा पोर्टल NATM टनेलिंग पद्धतीने अंदाजे 5 किमी बोगद्याच्या बांधकामाला मदत करेल.
महाराष्ट्रामधील निविदा स्थिती:
मुंबई एचएसआर स्टेशन [एमएएचएसआर पॅकेज सी-1] – करारनामा 20 मार्च 2023 रोजी स्वाक्षरित करण्यात आला.
मुंबई एचएसआर स्टेशन आणि शिळफाटा (अंदाजे 21 किमी) दरम्यान दुहेरी मार्गासाठी बोगद्याचे बांधकाम [एमएएचएसआर पॅकेज सी-2] – करारनामा आज म्हणजेच 08.05.2023 रोजी स्वाक्षरित करण्यात आला.
शिळफाटा आणि गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील झारोली गाव (135 किमी) दरम्यान 3 स्टेशन्स म्हणजेच ठाणे, विरार, बोईसर यांच्यासह सिव्हिल आणि बांधकाम कामे [एमएएचएसआर पॅकेज सी-3] – तांत्रिक निविदा 12 एप्रिल 2023 रोजी उघडण्यात आल्या.

