निर्माणाधीन मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील बोईसर स्थानकाच्या बांधकामात एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. स्थानकासाठी पहिल्या रेल्वे लेव्हल स्लॅबचे यशस्वी काँक्रीटिकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. हा स्लॅब सुमारे 40 मीटर रुंद आणि 37 मीटर लांब असून, त्यासाठी 1070 घनमीटरहून अधिक काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे. अशा एकूण 9 स्लॅब्स रेल्वे स्तरावर तयार करण्यात येणार आहेत, जे पुढील ट्रॅक लावण्याच्या कामासाठी पाया ठरणार आहेत. बोईसर स्थानक दोन स्तरांचे असेल – कॉन्कोर्स स्तर आणि रेल्वे स्तर. संपूर्ण स्थानकाची लांबी 425 मीटर असेल.
यासाठी सुमारे 8000 मेट्रिक टन स्टील व 42,000 घनमीटर काँक्रीट वापरण्यात येणार असून, फक्त कॉन्कोर्स स्तरावरील क्षेत्रफळ 6,000 चौरस मीटर असेल. संपूर्ण स्थानकाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 17,000 चौरस मीटर असेल.
बोईसर स्थानकाच्या इमारतीच्या दर्शनी भागाची रचना कोकणात वापरण्यात येणाऱ्या पारंपरिक मासेमारी जाळ्यांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आली आहे.
बोईसर बुलेट ट्रेन स्थानक सुरू झाल्यानंतर, ते आगामी वाढवण बंदर (23 किमी), बोईसर व तारापूर औद्योगिक क्षेत्र, तारापूर अणुऊर्जा केंद्र तसेच चिकणी, नंदगाव, शिरगाव, केळवा, दहाणू आणि बोरडी या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांसह हिरडपाडा व कालामंदेवी धबधब्यांसारख्या पर्यटनस्थळांना उत्कृष्ट दळणवळण प्रदान करेल.
स्थानकातील सुविधा:
दोन मजली या स्थानकात कॉन्कोर्स स्तरावर पेमेंट आणि नॉन-पेमेंट क्षेत्रात लाउंज, प्रतीक्षा कक्ष, स्मोकिंग रूम, फर्स्ट एड सुविधा, स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल. पातळी बदलासाठी लिफ्ट्स आणि एस्केलेटर्स तसेच दोन्ही क्षेत्रांमध्ये दुकाने उपलब्ध असतील.

