मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत अहमदाबाद जिल्ह्यातील दिल्ली–अहमदाबाद मुख्य मार्गावरील (पश्चिम रेल्वे) गिरधर नगर उड्डाणपुलावर रेल्वे ओव्हर ब्रिज (आर.ओ.बी.) वर व्हायाडक्टचे यशस्वी प्रक्षेपण पूर्ण झाले आहे. विद्यमान रेल्वे मार्गाच्या समांतर हा व्हायाडक्ट उभारण्यात आला असून, उड्डाणपुलावरील प्रक्षेपण कार्य दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी पूर्ण करण्यात आले.
या कामामध्ये 45 मीटर लांबीचा पूल ‘स्पॅन-बाय-स्पॅन’ (एस.बी.एस.) पद्धतीने प्रक्षेपित करण्यात आला.
ठळक वैशिष्ट्ये:
- उड्डाणपुलावरील स्पॅनची लांबी : 45 मीटर
- व्हायाडक्टची उंची (जमिनीपासून रेल्वे पातळीपर्यंत) : 19.5 मीटर
- प्रक्षेपित केलेले विभागांची संख्या : 19
- स्पॅनचे एकूण वजन : 1200 मेट्रिक टन
गिरधर नगर पूल हा दोन-लेनचा उड्डाणपूल असून अहमदाबादमधील सर्वाधिक वर्दळीच्या उड्डाणपुलांपैकी एक आहे, जो शाहिबाग, असावरा आणि कलूपूर या भागांना जोडतो. अहमदाबादमध्ये राहणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी हा दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा मार्ग आहे. सार्वजनिक गैरसोय कमी व्हावी यासाठी या उड्डाणपुलावरील प्रक्षेपणाचे काम अत्यंत काटेकोर नियोजनानुसार करण्यात आले आणि केवळ 12 दिवसांत पूर्ण करण्यात आले. हे कार्य 20 सप्टेंबरपर्यंत घेतलेल्या ब्लॉक कालावधीत यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.
सार्वजनिक गैरसोय आणखी कमी करण्यासाठी सर्व आवश्यक सुरक्षा व वाहतूक व्यवस्थापन उपाययोजना राबविण्यात आल्या. यामध्ये योग्य प्रकारचे बॅरिकेडिंग, वाहतूक वळणासाठी सूचना फलक, मार्ग बदलाची माहिती वेळेवर प्रसिद्ध करणे, पर्याप्त वाहतूक मार्शल्सची नेमणूक तसेच रात्रीच्या वेळेस पुरेशा प्रकाशाची व्यवस्था यांचा समावेश होता.
अतिरिक्त माहिती:
मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर अहमदाबाद जिल्ह्यातील एकूण 31 क्रॉसिंगवरून जात आहे. यात आय.आर. क्रॉसिंग (8 संख्या), रोड उड्डाणपूल, रस्ता, रोड अंडरपास, कालवे (16 संख्या), साबरमती नदीवरील 1 नदी पूल क्रॉसिंग आणि 6 स्टील ब्रिजेस यांचा समावेश आहे. यापैकी 15 क्रॉसिंगचे काम पूर्ण झाले आहे.

