Skip to main content
Skip to main content
Mar

NATIONAL HIGH SPEED RAIL CORPORATION LIMITED

नेशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

myth-vs-fact-banners1

आधुनिक रचना आणि संस्कृतीचा संगम, उत्कृष्ट संपर्क व्यवस्था आणि पर्यावरणपूरक वैशिष्ट्ये – बुलेट ट्रेन स्थानके प्रवाशांचा अनुभव नव्याने परिभाषित करण्यास सज्ज

Published Date

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प वेगाने पुढे जात आहे आणि गुजरातमध्ये आठ आधुनिक स्थानकांची उभारणी सुरू असून राज्यामध्ये मोठा बदल घडताना दिसत आहे. साबरमती, अहमदाबाद, आणंद, वडोदरा, भरुच, सुरत, बिलोरा आणि वापी येथील स्थानकांचे संरचनात्मक काम पूर्ण झाले असून, आतंरिक सजावट, छप्पर बसविणे आणि स्थानकांवरील सुविधा यांसारखी अंतिम कामे सध्या सुरू आहेत.

एकंदरीत कामे पूर्ण झाल्यावर ही स्थानके केवळ रेल्वेगाड्या पकडण्याची ठिकाणे राहणार नाहीत, तर जागतिक दर्जाचा प्रवास, आराम आणि सोयीचं प्रतीक ठरणार आहेत.

प्रवाशांच्या आरामासाठी या सर्व स्थानाकांची काळजीपूर्वक अशी रचना करण्यात आली आहे की ती संबंधित शहराच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतिबिंब दर्शवतात. मन:शांति देणाऱ्या आंतरिक रचना, सौंदर्यपूर्ण बाह्य रचना, नैसर्गिक प्रकाश आणि मोकळी हवा यांमुळे प्रवासाचा अनुभव शांत, सुखद आणि मनोहर करण्यावर भर देण्यात आला आहे.

स्थानकांच्या रचनेत शाश्वततेला प्राधान्य देण्यात आले आहे. काही स्थानकांवर स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्यासाठी सौर पॅनेल बसवले जात आहेत, तर स्कायलाइट्स आणि रुंद उघड्या जागांमुळे दिवसा कृत्रिम प्रकाशाची गरज कमी होणार आहे. प्लॅटफॉर्म भागामध्ये भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि हवेशीर व्यवस्था असेल.

स्थानक परिसरात सर्वत्र हरित आणि ताजेतवाने वातावरण निर्माण करण्यासाठी झाडे व रोपांची लागवड केली जात आहे. पर्जन्यजल संकलनासाठी भूजल पुनर्भरण विहिरींची व्यवस्था करण्यात आली आहे. पाणी पुनर्वापरासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रे (एसटीपी) बसवली जात आहेत. स्थानकांच्या बांधकामामध्ये पर्यावरणास अनुकूल रंग, पॅनेल्स, टाईल्स यांसारख्या साहित्यांचा वापर करण्यात आला आहे. या उपाययोजनांमुळे ही स्थानके केवळ आधुनिकच नव्हे, तर पर्यावरणदृष्ट्या जबाबदार देखील ठरणार आहेत.

प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक स्थानकावर अनेक लिफ्ट आणि एस्केलेटर बसवले जात आहेत, जेणेकरून सर्व स्तरांवर जाणे-येणे सहज आणि सर्वांसाठी सुलभ होईल — ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी आणि लहान मुलांसोबत असलेल्या कुटुंबांचाही समावेश आहे. प्रवाशांना कॉँकर्स, प्लॅटफॉर्म आणि गंतव्य क्षेत्रांमध्ये सहज मार्गदर्शन करण्यासाठी स्पष्ट दिशादर्शक फलक, माहितीदेयक काउंटर आणि सार्वजनिक घोषणा प्रणाली देखील बसवण्यात येत आहेत.

प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि आनंददायक करण्यासाठी प्रशस्त प्रतीक्षालये आरामदायक आसन व्यवस्थेसह, बिझनेस क्लास लाउंज, नर्सरी आणि बालसंगोपन सुविधा यांसोबतच फूड काउंटर, किरकोळ विक्री केंद्रे आणि इतर प्रवासी सेवा उपलब्ध असतील.

अहमदाबाद, वडोदरा, साबरमती आणि सुरत येथील स्थानकांना बहुमाध्यमीय परिवहन केंद्रांप्रमाणे विकसित केले जात आहे. याचा अर्थ असा की प्रवासी बुलेट ट्रेन, भारतीय रेल्वे, मेट्रो ट्रेन, बस, टॅक्सी, ऑटो आणि इतर स्थानिक वाहतुकीमधून सहजपणे बदल करू शकतील. अशा सुलभ समाकलनामुळे संक्रमणाचा वेळ कमी होईल, ज्यामुळे प्रवास जलद, सुरक्षित आणि सर्वांसाठी सोयीस्कर होईल. सर्व स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात येत आहे.

प्रत्येक बुलेट ट्रेन स्थानक केवळ एक प्रवासाची जागा नसून, ते कनेक्टिव्हिटी, शाश्वतता आणि सांस्कृतिक अभिमान यांचे प्रतीक म्हणून विकसित केले जात आहेत. तंत्रज्ञान आणि परंपरेचा संगम करणाऱ्या जागतिक दर्जाच्या सुविधा आणि अखंड समाकलनासह ही स्थानके प्रवाशांचा अनुभव नव्या पातळीवर नेणार आहेत.

Related Images