बांधकाम स्थळांवरील सुरक्षा महत्त्वाची आहे याबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि तिचे महत्त्व पुन्हा अधोरेखित करण्यासाठी, संवादात्मक नुक्कड नाटकांची मालिका 18 ऑगस्ट 2025 पासून अहमदाबाद बुलेट ट्रेन बांधकाम स्थळावर सुरू झाली आहे. या मोहिमेत एकूण 40 बांधकाम स्थळांचा (29 गुजरातमध्ये व 11 महाराष्ट्रात) समावेश आहे.
या नुक्कड नाटकांमध्ये उंचावर काम करणे, जड मशिनरीजवळ काम करणे, रस्ते व रेल्वेजवळ काम करताना घ्यायची काळजी तसेच कामाच्या वेळी मोबाईल फोनचा वापर टाळणे अशा महत्त्वाच्या सुरक्षा विषयांचा समावेश आहे. या नाटकांमधून कामगारांना नेहमीच सुरक्षेला प्राधान्य द्यावे असा ठाम संदेश दिला जात आहे.
बुलेट ट्रेन बांधकाम स्थळांवर देशाच्या विविध भागांतून आलेले आणि भिन्न भाषा व बोलीभाषा बोलणारे कामगार कार्यरत आहेत, त्यामुळे प्रभावी संवाद साधण्यासाठी ही नाटके साधी, स्पष्ट व सहज समजणारी भाषा वापरून सादर करण्यात आली.
ही मोहिम गुजरात व महाराष्ट्रातील अनेक बांधकामाधीन बुलेट ट्रेन स्थानके, कास्टिंग यार्ड्स, बोगद्यांची बांधकाम स्थळे, अनेक डेपो, ब्रिज आणि व्हायाडक्टपर्यंत पोहोचेल.
यापूर्वी एनएचएसआरसीएल ने 100 नुक्कड नाटके आयोजित केली होती ज्यामध्ये 15,000 पेक्षा अधिक बांधकाम कामगारांनी सहभाग नोंदवला होता.
एनएचएसआरसीएल सर्व बुलेट ट्रेन बांधकाम स्थळे सुरक्षित कार्यस्थळे बनविण्यास कटिबद्ध आहे. ही नुक्कड नाटके त्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.

