गुजरातमधील नडियादजवळ दिल्ली–मुंबई–चेन्नईला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-48 (NH-48) वर 2 × 100 मीटर लांबीच्या स्टील पुलातील पहिला 100 मीटर स्पॅन यशस्वीरित्या लॉन्च करण्यात आला.
'मेक इन इंडिया' अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या स्टील पुलामध्ये प्रत्येकी 100 मीटर लांबीचे दोन स्टील स्पॅन असून, बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी NH-48 ओलांडण्यासाठी त्यांची उभारणी करण्यात येत आहे. यापैकी पहिला स्पॅन यशस्वीरित्या लॉन्च करण्यात आला आहे.
NH-48 हा सहा पदरी (प्रत्येक दिशेला तीन लेन) असलेला देशातील सर्वाधिक वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गांपैकी एक आहे. पुलाचा पहिला स्पॅन एका टोकापासून सुमारे 200 मीटर सरकवून महामार्गावरील तीन लेनवर लॉन्च करण्यात आला. वाहतुकीत कमीत कमी अडथळा निर्माण होईल याची काळजी घेत नियोजनबद्ध पद्धतीने हे लॉन्चिंग करण्यात आले.
या 100 मीटर लांबीच्या स्टील स्पॅनची उंची सुमारे 14.6 मीटर, रुंदी 14.3 मीटर असून त्याचे वजन सुमारे 1,414 मेट्रिक टन आहे. या स्टील पुलांचे उत्पादन उत्तर प्रदेशातील हापूरजवळील सालासार येथील कार्यशाळेत करण्यात आले असून, त्यांचे आयुष्य 100 वर्षे लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आले आहे.
या पुलाच्या बांधकामात सुमारे 57,200 Tor-Shear Type High Strength (TTHS) बोल्ट, C5 प्रणालीचे पेंटिंग आणि इलास्टोमेरिक बेअरिंग्स वापरण्यात आले आहेत. पुलाचे असेंब्लीकरण जमिनीपासून 14.9 मीटर उंचीवर तात्पुरत्या ट्रेसल्सवर करण्यात आले. त्यानंतर प्रत्येकी 250 टन उचलण्याची क्षमता असलेल्या दोन अर्ध-स्वयंचलित जॅक आणि Mac-Alloy बार्सच्या साहाय्याने स्वयंचलित यंत्रणेद्वारे हा स्पॅन पुढे सरकविण्यात आला.
संपूर्ण बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये एकूण 28 स्टील पूल उभारण्याचे नियोजन आहे. यापैकी 11 पूल महाराष्ट्रात आणि 17 पूल गुजरातमध्ये बांधले जात आहेत. गुजरातमध्ये आतापर्यंत रेल्वे/DFCC मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि भिलोसा उद्योग परिसरावर 7 स्टील पूल यशस्वीरित्या लॉन्च करण्यात आले आहेत.

