पंतप्रधानांनी भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या चमूशी संवाद साधला
पंतप्रधानांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अंमलबजावणीतून मिळालेल्या अनुभवांचे दस्तऐवजीकरण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले
पंतप्रधान म्हणाले की, राष्ट्रासाठी काम करण्याची आणि काही नवीन योगदान देण्याची भावना निर्माण झाली की ती प्रबळ प्रेरणेचे स्रोत ठरते
गुजरातमधील सूरत येथे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अतिजलद बुलेट ट्रेन प्रकल्पाची प्रगती पाहणी केली. त्यांनी भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या चमूशी संवाद साधला आणि प्रकल्पाची प्रगती, विशेषतः निश्चित वेग आणि वेळापत्रकाच्या लक्ष्यांचे पालन याबाबत माहिती घेतली. कामगारांनी यावेळी पंतप्रधानांना प्रकल्प कोणत्याही अडथळ्याविनाच सुरळीतपणे पुढे जात असल्याची खात्री दिली.
केरळमधील एका अभियंत्यांनी नवसारी, गुजरात येथील नॉइज बॅरियर कारखान्यातील कामाचा अनुभव सांगितला. या ठिकाणी लोखंडी सळईच्या पिंजऱ्याच्या जोडणीसाठी रोबोटिक यंत्रणा वापरली जात आहे. मोदी यांनी तिला विचारले की, भारताची पहिली बुलेट ट्रेन तयार करण्याचा अनुभव तिला वैयक्तिकरीत्या कसा वाटतो आणि या ऐतिहासिक कामगिरीबद्दल ती आपल्या कुटुंबीयांना काय सांगू इच्छिते.
त्यावर या अभियंत्याने सांगितले की, राष्ट्राच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पात योगदान देण्याचा तिला अभिमान आहे आणि हा प्रकल्प तिच्यासाठी स्वप्नातील प्रकल्प तसेच तिच्या कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण आहे.
पंतप्रधानांनी राष्ट्रसेवेच्या भावनेवर प्रकाश टाकताना, राष्ट्रासाठी कर्तव्य करण्याची आणि काहीतरी नवीन योगदान देण्याची भावना जागृत होते तेव्हा ती प्रचंड प्रेरणेचा स्रोत ठरते, यावर भर दिला. त्यांनी याची तुलना देशाच्या अवकाश वाटचालीशी करताना, देशाचा पहिला उपग्रह प्रक्षेपित करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या भावना काय, कशा असतील याचे स्मरण केले आणि आज शेकडो उपग्रहांचे प्रक्षेपण केले जात असल्याचे सांगितले.
बंगळुरूची आणखी एक कर्मचारी श्रुती, मुख्य अभियांत्रिकी व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. तिने कठीण आरेखन आणि अभियांत्रिकी नियंत्रण प्रक्रियांविषयी माहिती दिली. अंमलबजावणीच्या प्रत्येक टप्प्यावर, तिच्या चमूने फायदे आणि तोटे लक्षात घेतले, त्यावर उपाय शोधले आणि सुरळित निर्दोष अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पर्यायही शोधले असे तिने अधोरेखित केले .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, इथे मिळालेले अनुभव ब्लू बुकप्रमाणे ध्वनिमुद्रित अथवा नोंदवले आणि संकलित केले तर देश मोठ्या प्रमाणात अंमलबजावणीकडे निर्णायक वाटचाल करू शकेल. भारताने प्रयोगातील पुनरावृत्ती टाळली पाहिजे आणि विद्यमान प्रारूपांमधून शिकलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती करावी, यावर त्यांनी भर दिला. प्रतिकृती तेव्हा अर्थपूर्ण ठरतील जेव्हा एखादी विशिष्ट कृती का केली आहे याची स्पष्टता असेल, असेही मोदी यांनी अधोरेखित केले. अन्यथा, पुनरावृत्ती दिशाहीन अथवा हेतूविरहित होऊ शकते असा इशाराही त्यांनी दिला. अशा प्रकारे नोंदी केल्या तर भविष्यात त्या विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरतील आणि राष्ट्र उभारणीत योगदान ठरू शकेल.
"आपण आपले जीवन इथे समर्पित करू आणि देशासाठी काहीतरी मौल्यवान मागे सोडून जाऊ," असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
एका कर्मचाऱ्याने कवितेद्वारे त्याची वचनबद्धता मनापासून व्यक्त केली. पंतप्रधानांनी त्याच्या समर्पणाचे कौतुक केले आणि प्रतिसादही दिला.
या भेटीदरम्यान, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधानांनी सुरतमधील बांधकामाधीन बुलेट ट्रेन स्टेशनला भेट देऊन मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉर (एमएएचएसआर) च्या प्रगतीचा आढावा घेतला - हा भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक आहे जो देशाच्या हाय-स्पीड कनेक्टिव्हिटीच्या युगात झेप घेण्याचे प्रतीक आहे.
एमएएचएसआर सुमारे ५०८ किलोमीटर लांबीचा आहे, ज्यामध्ये गुजरात आणि दादरा आणि नगर हवेलीमध्ये ३५२ किमी आणि महाराष्ट्रात १५६ किमी अंतर आहे. हा कॉरिडॉर साबरमती, अहमदाबाद, आणंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलीमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई या प्रमुख शहरांना जोडेल, जे भारताच्या वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये एक परिवर्तनकारी पाऊल आहे.
आंतरराष्ट्रीय मानकांनुसार प्रगत अभियांत्रिकी तंत्रांनी बांधलेल्या या प्रकल्पात ४६५ किमी (मार्गाचा सुमारे ८५% भाग) व्हायाडक्ट्सवर आहे, ज्यामुळे जमिनीवर कमीत कमी अडथळा येतो आणि सुरक्षितता वाढते. आतापर्यंत, ३२६ किमी व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले आहे आणि २५ पैकी १७ नदी पूल आधीच बांधले गेले आहेत.
बुलेट ट्रेन पूर्ण झाल्यानंतर, मुंबई आणि अहमदाबादमधील प्रवासाचा वेळ जवळजवळ दोन तासांपर्यंत कमी होईल, ज्यामुळे शहरांतर्गत प्रवास जलद, सोपा आणि अधिक आरामदायी होईल. या प्रकल्पामुळे संपूर्ण कॉरिडॉरमध्ये व्यवसाय, पर्यटन आणि आर्थिक क्रियाकलापांना चालना मिळेल, ज्यामुळे प्रादेशिक विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
सुमारे ४७ किमी लांबीचा सुरत-बिलिमोरा विभाग पूर्ण होण्याच्या प्रगत टप्प्यात आहे, ज्यामध्ये बांधकाम आणि ट्रॅक-बेड पूर्णपणे पूर्ण झाले आहे. सुरत स्टेशनची रचना शहराच्या जगप्रसिद्ध हिरे उद्योगापासून प्रेरणा घेत आहे, जी सुंदरता आणि कार्यक्षमता दोन्ही प्रतिबिंबित करते. प्रवाशांच्या आरामावर लक्ष केंद्रित करून हे स्टेशन डिझाइन केले गेले आहे, ज्यामध्ये प्रशस्त वेटिंग लाउंज, प्रसाधनगृहे आणि किरकोळ दुकाने आहेत. ते सुरत मेट्रो, शहर बस आणि भारतीय रेल्वे नेटवर्कसह अखंड मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी देखील प्रदान करेल.

